
प्रिय मित्रांनो ! संतांच्या कथा व चरित्रातून मिळणारा आनंद अवर्णनिय आहे. म्हणून चांगल ऐकाव चांगल लिहाव संतांचे गोडवे गावेत. संत आई सारखे नव्हे आईच आईची सुध्दा आई म्हणजे संत .... माझा विदयार्थी हेमंत देशमुख गजानन भक्त ! अगदी चांगली सांगड लागली . गजाननाची इच्छा !
रामनवमीच्या अगोदरच्या दिवशी बुलडाण्याला जातांना वाटेत, छानश्या झाडांच्या दाटीत चहाचा सुगंध सुटला होता. अनिवार इच्छा चहा पिण्याची ! पण नेमके माहिती नव्हते काय आहे आणी कशाचा कार्यक्रम आहे. बुलडाण्याचे काम आटोपले. परतीच्या प्रवासात पुन्हा तिथेच आलो . आता मात्र तिथे खामगावच्या दिशेने गजानन महाराजांचा फोटो लावलेले बॅनर होते, मग उत्सुकतेपोटी तिथे गेलो. या या ! प्रेमाने स्वागत झाले! तेथे गोळा झालेल्या भक्तांनी सांगीतले, पायदळ वारी करणा-या भाविकांचा थोडा श्रमपरिहार व्हावा, नविन स्फुर्ती मिळावी, म्हणून या जंगलात चहाची सोय केली आहे. वनविभागाने हातपंपाची व्यवस्था केली आहे. आम्ही वरवंड चे गजानन भक्त आहोत गावात गजाननाचे मंदीर बांधले आहे, कधीतरी दर्शनाला या ! या आग्रहाच्या निमंत्रणाचा आणि चहाचा गोडवा चिभेवर खेळवत आम्ही गजाननाला नमस्कार करून निघालो.
रस्त्याने जातांना म्हणालो, हेमंत उदया पायी शेगावला जावू या का ? आपण म्हणाल तसे सर ! मी : ठिक आहे, जायचेच ! बर काय नेवू रे गजानना साठी ? हेमंत : बेसन भाकरी आवडत होती सर महाराजांना .... तेच नेवू ....! मी : अरे नेहमी बेसन भाकरी .... त्यापेक्षा उदया रामनवमी आहे, पुरणपोळी नेवू महाराजांसाठी....... तु उदया सकाळी 3 वाजता घरी ये , मी आईला सांगून पुरणपोळी बनवून ठेवायला सांगतो. असे सांगून मी हेमंतचा निरोप घेतला.
घरी आलो रात्री आईशी बोलणे झाले नाही. मी पण झोपून गेलो. सकाळी 2.30 ला जाग आली, आता आईला उठवावे किंवा नाही असा प्रश्न पडला ! शेवटी ती पण गजानन भक्तच ! आवाज दिला .... मनातील गोष्ट सांगीतली. आई आनंदाने तयार झाली .... 15 मिनिटात कुकरच्या शिटया झाल्या 30 मिनिटात जायफळ आणि तुपाचा सुवास सा-या घरात दरवळत होता......
मग आम्ही सगळे 3.30 चे सुमारास निघालो, अमरसिंग लंगडा, गोविंद हूरपडे वकीलसाहेब, हेमंत देशमुख सोबत होतेच .... रस्त्याने गारडगावची चिमुरडी 12 - 13 वर्षाची मुले छान रमत गमत निघाली होती. मुखाने अभंग गात ... गजानन महाराजांचा जयजयकार करीत.... शिस्तीत आम्ही जात होतो. मी देखील बासरी काढून भुपाळीने महाराजांना आळविले. 7 वाजेच्या सुमारास आम्ही शेगावात पोचलो. दर्शनबारीमध्ये भारी गर्दी पण अतिशय शिस्तबध्द व शांत वातावरण ....! दर्शनबारीमध्ये एक मध्यम वयाचे जोडपे अतिशय तालबध्द स्वरात महाराजांची भजने गात होते. त्यांच्या आवाजातून महाराजांच्या भेटीची ओढ हृदयाला पिळवटून टाकत होती. अतिशय भारलेल्या, मंतरलेल्या अनामिक ओढीने 2 तासानंतर गाभा-यात प्रवेशित झालो. प्रचंड गर्दीचा ताण सेवकांवर आलेला दिसत होता. सारख्या त्याच त्याच सुचना देत भक्तगणांना ‘’ माउली ‘’ अशी प्रेमाने साद घालतांना त्यांना जराही थकवा येत नव्हता.
आता महाराजांची मुर्ती प्रत्यक्ष समोर होती. जगाच्या बादशहा समोर हातातला पुरणपोळीचा डबा फारच क्षुल्लक वाटत होता. सुदाम्याला पोहे घेवून जातांना काय वाटले असेल....... ! अशातच माझ्या समोर असलेल्या भक्ताने त्याच्या जवळचा प्रसाद महाराजांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला असता कधिही न चिडणारा सेवक प्रचंड चिडला व प्रसाद वर राम मंदिरात ठेवा इथे नाही , असे ओरडून त्याने तो प्रसाद पुन्हा भक्ताच्या अंगावर फेकून दिला. मी खटटू झालो. हेमंतकडे पाहीले.... त्याचीही अवस्था काही वेगळी नव्हती. काय होणार आहे, याची आम्हाला कल्पना आली. अर्धवट उघडलेला डबा मी बंद करू लागलो होतो........ एक एक क्षण युगांसारखा वाटत होता....... पण माझ्र्या मनातली घालमेल अनंतकोटी ब्रम्हांडनायक, महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह , सत्चितानंद , भक्त प्रतिपालक , शेगावनिवासी समर्थ सदगुरू श्री. गजाननाच्या लक्षात आली होती......... भारावलेल्या मनाने बाहेर जाण्याच्या रस्त्याने वळलो......आणि अचानक .......अहो तो डबा इकडे दया ! माझा माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता ...... हेमंतही थबकला .....सेवक म्हणत होता ... डबा दया ... वेळ थांबली होती. सेवकाने आमच्या हातातला डबा घेतला...... म्हणाला महाराजांना नैवेदय दाखवतो....... डोळयांमध्ये आसवांनी गर्दी केली होती..... आवाज बाहेर निघत नव्हता...... वारी सफल झाली होती...... गजाननाच्या प्रितीचा अनुभव आला होता..... माझा विश्वास अनाठाई नाही .... मी आहेच आहे !!! या वचनाची महाराजांनी अनुभूती दिली होती.......... आवाज ऐकु येत होता ..... ‘’
मी गेलो ऐसे मानु नका .......!
